तुंबाड साहित्याचे आणि निसर्गाचे

OLYMPUS DIGITAL CAMERA

“तुंबाड साहित्याचे आणि निसर्गाचे “

इंग्रजी भाषांतर

बाळाने आपल्या आईच्या कुशीत शांतपणे झोपावे तस तुंबड जगबुडी नदीच्या काठावर विसावल आहे. खेडहून नागमोडी वळण घेत निघालेली जगबुडी तुंबाडहून पुढे दाभोळला समुद्राला मिळते. संथ काळेशार पाणी, पाण्यात पाय सोडून बसलेले मचवे, हिरवेगार डोंगर, पिवळीधम्मक शेती, खाजणात विसावलेल्या सुसरी मगरी, भारभूत होऊन हेलकावणारे माड यातून सर्वात प्रथम दिसतो टेकडीवरचा सवणसचा दर्गा. एक वळण घेतलं कि समोर दिसत ते निसर्गातील सार सौंदर्य आपल्या अंगणात घेवून उभं असलेलं तुंबड.

    १९८७ साली श्रीनांची ‘तुंबड खोत’ हि महाकादंबरी तुंबडलाच प्रकाशित झाली. विंदा करंदीकर, ना. सं. इनामदार, सुभाष अवचट आदी साहित्यिक त्या समारंभात हजार होते. त्यावेळी प्रकाशन समारंभात श्री. ना म्हणाले “या अंगणात बकुळीचा पार होता मला साक्ष्यात्कार झाला आपल्या कादंबरीकरिता आपण जी भूमी शोधात आहोत ती हीच आहे मला असं का वाटल ते सांगता येत नाही. लेखकाला असं कधी सांगता येत नाही. पान माझा तुंबड आणि कादंबरीतील तुंबड यात भूगोलाव्यातिरिक्त कोणतेही साम्य नाही. २४ वर्षे बाबल्याशेट यांच्याशी बोलत असताना डोक्यात कादंबरीचा बारीक कुळ असायचा. इथली माणस, इथला तपशील वातावरण यासंबंधी मला त्यांच्याकडून समजल. जगबुडी खोर्याचा जर तुम्हाला त्रास झाला नाही तर कादंबरी अयशस्वी झाली अस मी समजेन.”

      ज्याला संवेदनशील मन आहे त्याला जगबुडीचा त्रास होतोच. जवळजवळ सर्वच साहित्यिकांना तुंबाडची अनिवार ओढ आहे. माधव मनोहारांपासून ते विश्वास पाटील मधु मंगेश कर्णिकांपर्यंत सार्यांनी तुंबाडला हजेरी लावली आहे. तुंबड हे माझ्या आयुष्यात जीव जडलेले गाव. माणसांचे ऋणानुबंध जसे माणसांशी जुळतात तसे गावाचे. तुंबडला जायचे म्हणजे पौर्णिमा हवी. लख्ख चांदण माडाच्या झावलंमधून झिरपत नदीत पडत आणि सारा आसमंत चांदण्यात न्हाऊन निघतो. जणू निसर्गातल सर सौंदर्य आणि आनंद आपल्या कवेत येतं. छोट्याश्या होडीतून वल्ही मारत केलेला फेर फटका अनादनिधान असत. समोरच्या अंजनी स्टेशनामधून बाहेर पडलेली कोकण रेल्वेची लांबचलांब गाडी तिच्या प्रकाशात भोगाद्यात शिरतानाची दृश्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा “पाकिजा” ची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तुंबाड म्हणजे निसर्गाला पाडलेल सुंदर स्वप्न.

      धक्यावरून अंगानात शिरतो आणि क्षणात आपल्या लक्ष्यात येत या अंगणात सार्या घराचा जीव आहे. सभोवताली झाडांची गर्द सावली. गार मंद वारा, पारिजातकाचा दरवळलेला सुवास, मध्येच पिकलेल्या आंब्यांचा पडताना झालेला आवाज या सार्या नैसर्गिक वातावरणात आपण ताजेतवाने, पसन्न होतो. आंब्याच्या झाडांना देखील महाभारतातील नवे, एका बाजूला पाच पांडव व दुसर्याबाजूला कोपर्यात एकटा उभा असलेला कर्ण  त्याच्या पलीकडे बृहस्पतीदेखील आहे. बाबल्याशेटना झाडांचे विलक्षण प्रेम. जिथे जातील तेथून रोप आणून श्रद्धेने जागविली आणि त्याच झाडाच्या बिया त्यांनी अनेकांना वाटल्या.

      घरात शिरल्यावर दृष्टीपतीस पडतो तो घरावर अखंड मायेची सावली धरणारा महापुरुष औदुंबर सार्यांचाच श्रद्धास्थान. संध्याकाळी औदुंबरापाशी लावलेला दिवा वातावरणातील मांगल्य व पावित्र्याची जाणीव करून देतो. घराच्या सभोवताली केळी, अननसापासून कळकीच्या बेटापर्यंत चे अनेक वृक्ष दाटीवाटीने उभे आहेत. घराच्या मागील बाजूने डोंगराच्या दिशेने जाणार्या लाल मातीच्या वळण घेतलेल्या चढणीवरून केलेली भटकंती तुम्हाला वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते. गर्द झाडीतून येणार्या कोवळ्या उन्हाची तिरीप तुमच्या गात्रात उर्जा निर्माण करते. करवंदीच्या जाळीतून, काजूची बोंडे, पिकलेले जांभूळ आणि चिंचेची चव घेत वार्याच्या मंद झुळुकीबरोबरची भटकंती कधी संपू नये असं वाटत. सार कस मनोसोक्त.

      पारिजातक, सोनचाफा बरोबर सर्पगंध, पंचनाग, अग्निशाख, कैलासपती अशी विविध फुलांच्या अनेक जाती आपल्या नजरेस येतात. नदीकाठच्या नेवरीच्या तुर्याला आलेल्या फुलांचा नदीच्या पाण्यात सडा पडतो आणि “लाव्हेडर” रंगाची फुलांची नादाने पांघरलेली शाल आपण अनुभवतो तेव्हा आपल्याला काश्मीर खोर्याचा क्षणभर भास होतो. अधून मधून दिसणारे लाव्हा, ससाण, घनेश पक्षी या रानसौंदर्याची नजाकत आणखीनच वाढवतात. तुंबाडमधील पाहत सुचीर्भूत, सकाळ प्रसन्न, संध्याकाळ रमणीय तर रात्र काही गूढ, गंभीर आणि अनाकलनीय

      पावसाळ्यात प्रचंड पुरामुळे “जगबुडी” आक्रारविक्रार रूप धारण करते आणि आपले नाव सार्थ करते. एरव्ही जगबुडीचा प्रवाह शांत, समजूतदार. जगबुडीमध्ये यथेच्च डूमबाव, पोहाव. धक्यावरून मारलेला सूर नदीचा तळ दाखवतो. जगबुडीच्या काठावर खाजणात सुसरी, मगरी विसावलेल्या असतात. आपली चाहूल लागली कि हळूच पाण्यात माघारी जातात. एव्हाना भोर्प्यांनी होडीतून आणलेले ताजे फडफडीत मासे आपली वाट पाहत असतात. अलीकडे लोटे माळावरील कारखानदारांच्या प्रदूषणामुळे नदीचा रंगही बदलला आणि मासेही दुर्मिळ झाले. दरवर्षी वैशाख पौर्णिमेला तुंबाडच्या खोतांची नदीची ओटी भरण्याच्या परंपरेप्रमाणे या नदीची ओटी भरली जाते.

      भल्या पाहते कोकिळेच्या आवाजाने पक्षांच्या किलबीटात आपल्याला जाग येते आणि धुक्याच्या आसमंतात आपण धक्यावर उभे असतो. आपल्या नजरेतून हिरवाई झिरपत असते. आपल मन अवघडलेल असत तेव्हाकशाचच भान राहत नाही. अवघी सृष्टी आपल्या नजरेत असते. धक्का सुटला तरी “तुंबाड” एव्हाना मनात खोलवर रुतलेल असत. अनुभवलेले हे सारे क्षण आयुष्य पुढे नेतात, मागे वळून पाहायला लावतात, हेलावून टाकतात. एवढ्यात मोर थुइथुई नाचणारा मोरे दिसतो. मनातल्या मोराची त्या मोराशी दृष्टीभेट होते.